प्रतिक मोहिते, सर्वात बुटका बॉडीबिल्डर, गिनीज रेकॉर्ड

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये अनेक विभागात रेकॉर्ड नोंद केली जातात. त्यात जगातील सर्वाधिक उंच महिला पुरुष यांची जशी नोंद होते तशीच जगातील सर्वात ठेंगू महिला पुरुष यांच्याही नावाची नोंद होते. एखाद्याचे शरीर किती छोटे अथवा मोठे असावे याला काही नियम नाही. पण किती नाही म्हटले तरी अश्या व्यक्ती अनेकदा टिंगल टवाळीचा विषय झालेल्या पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील २६ वर्षीय प्रतिक विठ्ठल मोहिते हा तरुण सुद्धा त्याला अपवाद नाही. मात्र निसर्गाने दिलेल्या शरीरातील कमतरतेचा फायदा जिद्दीने करून घेण्याचे त्याच्याइतके चांगले उदाहरण अन्य नसेल. अवघी ३ फुट ४ इंच उंची लाभलेल्या प्रतिकने जगातील सर्वात बुटका बॉडीबिल्डर म्हणून स्वतःचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्याची किमया करून दाखविली आहे.

प्रतिकचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. १२ वर्षाचा होण्यापूर्वीच त्याला भारतीय सेनेत जाण्याची इच्छा होती पण जेव्हा त्याच्या शरीराची उंची वाढू शकत नाही हे सत्य समोर आले तेव्हा त्याने स्पोर्ट्स क्षेत्राची निवड केली. निसर्गाने त्याला परफेक्ट बॉडी दिली नाही पण हीच कमतरता त्याने स्वतःची ताकद बनविली. प्रतिकची त्याच्या कमी उंचीवरून नेहमीच टिंगल केली जायची. पण त्याचा मामा वर्कआउट करायचा ते पाहून प्रतिकने सुद्धा आपण बॉडीबिल्डर व्हायचे असा निर्णय घेतला आणि कसून मेहनतीला सुरवात केली. मित्राच्या सांगण्यावरून त्याने वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न करायचे ठरविले आणि तीन वेळा गिनीज साठी प्रयत्न केलेही. मात्र त्यावेळी ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण उमेद न सोडता याने चौथ्या वेळी गिनीज साठी प्रयत्न केला आणि त्यात मात्र तो यशस्वी झाला आहे.

२०१६ मध्ये त्याने प्रथम स्टेजवर बॉडीबिल्डींग स्पर्धेत आगमन केले तेव्हाही लोक हसणार अशी त्याला भीती वाटत होती. पण लोकांनी उलट त्याचे कौतुक केले आणि मग २०१८ मध्ये त्याने महाराष्ट्रासाठी रजत पदकाची कमाई केली. आता त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे.