या देशात बनणार पहिली बिटकॉइन सिटी

डिजिटल किंवा क्रीप्टो करन्सी बिटकॉइन ला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश बनलेला अल साल्वाडोर आता जगातील पहिली बिटकॉइन सिटी बनविण्याच्या तयारीला लागला आहे. शनिवारी अल साल्वाडोरचे राष्ट्रपती नायब बुकेले यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. यावेळी ते म्हणाले जगातील पहिली बिटकॉइन सिटी देशात बनविली जाणार असून त्यासाठी बिटकॉइन बॉंड मधून फंड्स उभे केले जाणार आहेत.

बुकेले म्हणाले २०२२ पासून बिटकॉइन वित्त पोषण सुरु केले जाईल आणि हे बॉंड २०२२ पासून उपलब्ध होतील. जगातील या पहिल्या अनोख्या बिटकॉइन सिटी मध्ये व्हॅल्यु अॅडेड टॅक्स म्हणजे व्हॅट शिवाय अन्य कोणतेही कर नसतील. टेक्नॉलॉजी प्रदाते ब्लॉकस्ट्रीमचे प्रमुख अधिकारी सॅमसन मो यांनी सांगितले कि नियोजित बिटकॉइन सिटी साठी पैसा उपलब्ध केला जाणार असून त्यासाठी अल साल्वाडोरने बिटकॉइनचे समर्थन करून जगातील पहिला देश बनण्याची कामगिरी केली आहेच, आता देश यासाठी १ अब्ज डॉलर्सचे बॉंड आणेल. सप्टेंबरमध्ये या देशाने डिजिटल करन्सीला अधिकृत मान्यता दिली आहे.

डिजिटल किंवा क्रीप्टोकरन्सीलाच इंटरनेट करन्सी असेही म्हटले जाते. ही करन्सी घरात किंवा पाकिटात साठवता येत नाही तर तिचा वापर फक्त ऑनलाईनच करता येतो. या करन्सीच्या नियंत्रणांसाठी कोणतीही अॅथोरिटी, बँक अथवा सरकार काम करत नाही.