भारतीय सेनेच्या बीआरओने नोंदविले गिनीज रेकॉर्ड

भारतीय लष्कराचा एक भाग असलेल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने त्यांच्या नावाची नोंद जगप्रसिद्ध गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये केली आहे. लदाख भागात १९३०० फुट उंचीवर जगातील सर्वाधिक उंचीवरचा मोटरेबल रोड बनवून त्याचे डांबरीकरण केल्याबद्दल बीआरओचे नाव गिनीज मध्ये नोंदले गेले आहे. उम्लिंग ला पास रोड असे या रस्त्याचे नाव असून खारदुंगला नंतर वाहन चालविण्यासाठी बनलेला जगातील हा सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याचे आव्हान बीआरओने यशस्वी रित्या पूर्ण केले आहे. अति दुर्गम भागात आणि उंचावरील प्रदेशात रस्ते बांधणी करण्याचे बीआरओचे कौशल्य जगात वाखाणले जाते.

केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी बीआरओच्या या कामगिरीची माहिती ट्वीटर वरून शेअर करून या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणतात, लदाख भागात १९०२४ फुट उंचीवर उम्लिंगला मोटरेबल रोड डांबरीकरण काम पूर्ण केल्याबद्दल बीआरओला हार्दिक शुभेच्छा.’

५२ किमी लांबीचा हा रस्ता पूर्व लदाख चुमार सेक्टरला जोडतो. या वर्षी ऑगस्ट मध्ये त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्याचा वापर अति दुर्गम चीसूमले व थेमचूक साठीही होणार आहे. स्थानिक लोकांना या रस्त्याचा फार उपयोग होणार आहे. थंडीच्या दिवसात येथील तापमान उणे ४० डिग्रीवर जाते आणि ऑक्सिजनची पातळी हवेत अतिशय कमी प्रमाणात असते. त्यामुळे येथे रस्ता बांधणी अतिशय खडतर आव्हान होते.

या रस्त्याने गिनीज मध्ये नाव नोंदविताना बोलिव्हिया मधील १८९५३ फुट उंचीवर बांधल्या गेलेल्या रस्त्याचे रेकॉर्ड तोडले आहे. बोलिव्हिया मधील हा रस्ता उतरुंकू ज्वालामुखीला जोडणारा आहे.