रामदास कदम मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार का? संजय राऊत म्हणाले…


मुंबई – आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्यांना डावलून सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली का? असा प्रश्न विचारला असता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास कदम देखील शिवसेनेचे नेते आणि कडवट शिवसैनिक आहेत. अनेक वर्षे ते आमदार आणि मंत्री होते. सुनिल शिंदे हे देखील कडवट शिवसैनिक आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीची जागा सोडून त्यांनी त्याग केला असल्याचे मत संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले, सुनिल शिंदे हे कडवट शिवसैनिक असून रामदास कदम हे देखील शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचे नेतृत्व केले आहे. वरळीचे सुनिल शिंदे आमदार होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती जागा त्यांनी सोडली. हा त्यांचा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या त्यागाचे निष्ठेचे स्मरण ठेवले आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर आणण्यासाठी उमेदवारी दिली.

रामदास कदम यांच्यावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर बोलणे टाळले. ते म्हणाले, पक्षासाठी रामदास कदम यांनी अनेक वर्षे काम केले आहे. अनेक वर्षे ते आमदार होते, अनेक वर्षे मंत्री होते. विधान परिषदेत देखील त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले आहे. ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही एकत्र काम करू.

यापुढे रामदास कदम मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मी काय मार्गदर्शक आहे का? असा प्रति प्रश्न विचारला. पक्षाचे आम्ही नेतृत्व आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्वांना पक्षाच्या नेतेपदी नेमले आहे. अनेक वर्षे आम्ही पक्षाचे काम करत आहोत. त्यामुळे कुणी नाराज होण्याचे कारण नसल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले.

पुढे संजय राऊत म्हणाले, कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. शेतकरी दीड वर्षापासून ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता, ते जोखड आता निघाले आहे. स्वातंत्र्य काय असते? कंगना राणावत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.

या देशात नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी लादली जाणार होती. ज्या प्रकारे व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला, त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडले, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, जसे मोदी सांगत होते, तसे हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावे लागले. ३ काळे कायदे रद्द होत आहेत, हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले आहे, भिकेत मिळवले नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे.

ब्रिटिशांनी आमच्या वीरांना जालियनवाला बागेत देखील चिरडले, त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेसारखे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, असेही राऊतांनी नमूद केले.