क्रांती रेडकर आणि नवाब मलिकांच्या मुलीमध्ये ट्विटर वॉर


मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर रेस्टॉरंट आणि बारचा परवाना असल्याचा आणखी एक गौप्यस्फोट केला. मलिक यांनी गुरुवारी सायंकाळीच आपण उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. समीर वानखेडे यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास याच पार्श्वभूमीवर ट्विटरवरुन नवाब मलिक यांना टोला लगावला होता. क्रांतीने केलेल्या या टीकेवर नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खानने उत्तर दिले होते. ही पत्रकार परिषद सुरु होण्याआधीच या दोघींमध्ये ट्विटर वॉर पहायला मिळाले.

शुक्रवारी सकाळी वाशीमधील सद्गुरु बार आणि रेस्ट्रॉचा परवाना समीर वानखेडेंच्या नावे असणारे सूचक ट्विट नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्विटरवरुन खोचक शब्दामध्ये ट्विट केले होते. वा काय दहशत आहे. झोपताना, उठताना, बसताना नवाब काका केवळ समीर वानखेडेबद्दल विचार करतात. सकाळ झाली नाही की ट्विट सुरु. भीती निर्माण करावी, तर अशी. ही एका इमानदार अधिकाऱ्याची ताकद असल्याचे क्रांती ट्विटमध्ये म्हणाली.

९ वाजून ३९ मिनिटांनी क्रांतीने केलेल्या या ट्विटला अर्ध्या तासाच्या आत नवाब मलिक यांची मुलगी निलोफरने ट्विटरवरुनच उत्तर दिले. क्रांतीचे ट्विट कोट करुन रिट्विट करत निलोफरने त्यावर कमेंट दिली. भीती त्यांना असते, ज्यांनी छळ आणि कपटीपणा केला असतो. पर्दाफाश होण्याच्या भीतीने सुरु असणारी ही तडफड बंद करा, याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे निलोफरने म्हटले.