संशोधनातून खुलासा; गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना कोरोनाचा सर्वाधिक धोका


वॉशिंग्टन : एका मोठ्या संशोधनातून अमेरिका सरकारने खुलासा केला आहे की, कोरोनाबाधित न झालेल्या गर्भवती महिलांपेक्षा कोरोनाची बाधा ज्या गर्भवती महिलांना झाली आहे, त्यांना बाळंतपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बाळंतपणात कोरोनाबाधित गर्भवती महिलांना अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय स्टिलबर्थ म्हणजेच, गर्भपात होण्याचा धोकाही सर्वाधिक असतो. त्यासोबतच या संशोधनात असे देखील म्हटले गेले आहे की, डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्यानंतर हा धोका जवळपास चार पटींनी अधिक वाढतो. मार्च 2020 आणि सप्टेंबर 2021 मध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या रुग्णालयात झालेल्या 1.2 दशलक्ष प्रसूतींवर सेंटर्स फॉर डिजीज अँड प्रिवेंशनचे हे विश्लेषण आधारित होतं.

संशोधनातून दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित मातांनी मृत बालकांना जन्म दिल्याची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ होती. सरासरी हा दर 0.65 टक्के होता. परंतु, कोरोनाची लागण झालेल्या मातांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या आधी स्टिलबर्थ 1.47 पटींनी अधिक सामान्य होते. हे प्रमाण डेल्टा व्हेरियंटनंतर 4.04 पटींनी अधिक आणि समग्र रुपात 1.90 पटींनी अधिक होते.

संशोधकांनी संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या संशोधनात असं सुचवलं होतं की, वाढीव जोखीम होण्याचं संभाव्य जैविक कारण नाभीसंबधीचा दाह किंवा रक्त प्रवाह कमी होण्याचा परिणाम असू शकतो. ते म्हणाले की, कोरोनामुळे स्टिलबर्थचा धोका वाढतो. कोरोनाबाधित मातांची प्रसूती अधिक गुंतागुंतीची होते, तसेच अनेक समस्या उद्भवतात. त्याबाबत अधिक तथ्य तपासून पाहणे गरजेचे असते. त्यामुळे या प्रकरणात अधिक संशोधनाची गरज आहे.