पालकमंत्री शिंगणे, विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित


औरंगाबाद – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, रविकांत तुपकर यांचे गेल्या चार दिवसांपासून सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरु होते. तुपकरांची तब्येत ढासळत असल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढू लागली होती.

दरम्यान रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. काल तुपकर यांची प्रकृती अन्नत्याग आंदोलनामुळे खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. कोणत्याही प्रतिसाद प्रशासनाकडून न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर हे आंदोलन आणखी चिघळले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी पोलिसांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

रात्री पुन्हा रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागले. बुलडाणा तहसीलदार यांची गाडी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पेटवली. तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापल्याचे पाहायला मिळाले. 17 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काल (शुक्रवारी) संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्यागाचा आज चौथा दिवस असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला आहे.

दरम्यान कोणताही प्रतिसाद प्रशासनाकडून नसल्यामुळे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनाने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळले. परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, रात्री उशिरा बुलडाणा तहसीलदार यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न काही आंदोलकांनी केल्यामुळे पोलीस बंदोबस्तात आज अजून वाढ करण्यात आली होती. आता आंदोलन स्थगित करण्यात आले असून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.