प्रकाश आंबेडकर यांनी समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत केले महत्त्वाचे वक्तव्य


पुणे – मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच त्यांनी वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत, ते बरोबर असल्याचे सांगितले. समीर वानखेडे यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर वडिलांनी स्विकारलेला मुस्लीम धर्म न स्विकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचे जाहीर केल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुस्लीम धर्म समीर वानखेडे यांच्या वडिलांनी स्विकारला आणि नंतर समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वयात आल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित धर्माचे असल्याचे त्यांनी जाहीर केले. यांसदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल मी सर्व लोकांच्या माहितीसाठी वाचून दाखवतो. सिव्हिल नंबर ७०६५/२००८ हा निकाल २६ फेब्रुवारी २००५ रोजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि गौवडा जी यांनी दिला आहे.

समीर वानखेडे यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार बरोबर आहे. सध्या वानखडे यांचे प्रकरणी जातपडताळणी समितीकडे गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या प्रकरणातील पक्षकार पाहिले, तर के. पी. मन्नू विरुद्ध जातपडताळणी समिती अशाच आहेत. त्यामुळे माझ्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला असला, तरी मी वयात आल्यानंतर तो स्विकारलेला नाही, हे समीर वानखेडे यांचे म्हणणे बरोबर असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, १८ वर्षांचा होईपर्यंत कुठलेही मुल आपल्या आई-बापाच्या ताब्यात असतो. त्यामुळे पालक म्हणून आई-वडिलांनी केले, ते त्या मुलाला लागू होते असं नाही. स्वतंत्र राहण्याचा अधिकार त्या मुलाला असतो म्हणून समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबतचा उपस्थित केलेला मुद्दा या निकालात पूर्णपणे समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देखील याच संदर्भात होता.

या प्रकरणात वडिलांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला, परंतू मुलाने वडिलोपार्जित धर्म स्विकारला. त्यामुळे त्या मुलाने तो मादिगा असल्याचे म्हटले. तसेच त्याचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाचा निकाल मुलाच्या विरोधात लागला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मुलाचे वडिलोपार्जित धर्माचे म्हणणे ग्राह्य धरले. तसेच मुलाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मान्य केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने याच निकालात कुळ हा शब्द वापरला. तसेच त्या कुळातून मुलाला बाहेर काढले गेले नाही. त्यामुळे कुळानुसार मुलाला वडिलोपार्जित जात मिळते, असे म्हटले आहे. मी समीर वानखेडे यांच्याबाबत वर्तमानपत्रांमधून जे वाचत आहे, ते प्रकरण असेच असल्याचे वाटते. त्यामुळे समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र रद्द होईल, असे वाटत नसल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.