मोदींनी कृषी कायदे मागे घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला : देवेंद्र फडणवीस


नाशिक – शुक्रवारी केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. विरोधकांनी देशाला संबोधित करताना केलेल्या या घोषणेनंतर आगामी काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची टीका केली. पण राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर देताना मोदींनी कायदे मागे घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच फडणवीस यांनी टीकाकारांनाही त्याचप्रमाणे थेट नाव न घेता काँग्रेसलाही टोला लगावला आहे.

कृषी कायदे रद्द झाले आहेत, त्यावरुन विरोधकांकडून अशी टीका होत आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे, देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात काय सांगाल असा प्रश्न आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारला. फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना, टीका करणारे टीका करत असतात, काम करणारे काम करत असतात. शेतकऱ्यांच्या हितामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला होता. परंतू काही लोक त्याला सातत्याने विरोध करत राहिल्यामुळे पंतप्रधानांनी काल स्पष्टपणे सांगितले की, काही लोकांना मी पटवू शकतो नाही म्हणून मी हा कायदा परत घेत असल्याचे सांगितले.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, मला असे वाटते की लोकशाहीमध्ये अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवतात. मोदीजींनी तो दाखवलेला आहे. त्यामुळेच जे यासंदर्भात टिका करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांकरिता कधी काहीच केलेले नाही. जे काही केले आहे, ते मोदीजींनी केले आहे. आज किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ज्याप्रकारे शेतकऱ्यांना मदत मिळते, ती पाहा. एकट्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ९ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान योजनेमधून गेली, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ते कृषी क्षेत्राचे बजेट ३५ हजार कोटींचे होते, ते आता मोदीजींच्या राज्यात १ लाख ३५ हजार कोटींचे झाले असल्यामुळे जनताच टीकाकारांना उत्तर देईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.