अमृता फडणवीसांनी गायले श्रीलंकन गाण्याचे हिंदी व्हर्जन, नेटकऱ्यांनी केले ट्रोल


सोशल नेटवर्किंगवर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी तसेच गायिका अमृता फडणवीस या चांगल्याच सक्रीय असतात.त्या कधी अप्रत्यक्षपणे राजकीय परिस्थितीवर केलेले भाष्य, तर कधी त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा असल्याचे दिसून येतात. अमृता फडणवीस कालपासून पुन्हा चर्चेत असण्यामागील कारणही त्याचे नवे गाणे आहे. अमृता यांनी ‘मानिके मागे हिते’या श्रीलंकन गाण्याचे हिंदी व्हर्जन गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ अमृता यांनी कालच आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

जगभरामध्ये श्रीलंकन गायक योहानी डिलोका डी सिल्वाने गायलेलं हे गाणे धुमाकूळ घालत असतानाच अमृता यांनी याच गाण्याच्या चालीवर त्याचे हिंदी व्हर्जन गायले आहे. अमृता यांनी या गाण्यामध्ये एका पॅचमध्ये रॅप साँग पद्धतीचे गायनही केले आहे. अमृता यांनी हे गाणे सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणामद्ये थोडे चील-पील व्हा या कूल गाण्यासोबत, अशा कॅप्शनसहीत शेअर केले आहे. पण अमृता यांना या गाण्यावरुन ट्रोल केले जात आहे. अमृता यांनी ट्विटरवरुन या गाण्याची लिंक शेअर करताना त्याच्यावर कोणाला कमेंट्स करता येणार नाही, याची काळजी घेतली आहे.

या गाण्याच्या व्हिडीओवर फेसबुकवर अनेक कमेंट्स आल्या असून काहींनी कौतुक केले आहे, तर काहींनी अमृता यांना ट्रोल केले आहे. पण व्हिडीओ खालील बऱ्याच कमेंट्स या ट्रोल करणाऱ्या कमेंट्स आहेत. काहींनी पुरुष दिनाच्या दिवशी हे ऐकावे लागल्याबद्दल कमेंट केली आहे, तर काहींनी तुम्ही गायिका असल्यामुळे अशापद्धतीने एखाद्या गाण्याचे हिंदी व्हर्जन गाण्याऐवजी नवीन गाणी गायली पाहिजेत, असा सल्ला दिला आहे.

यापूर्वी अमृता यांनी मुंबईतील नदी संवर्धनासाठी गाणे गायले होते. त्याचबरोबरच अमृता यांनी तिला जगू द्या हे स्त्री भ्रूणहत्या रोख्यासंदर्भातील जनजागृती करणारे गाणे देखील यापूर्वी गायलेले आहे.