गोपीचंद पडळकर यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका


मुंबई – आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकार म्हणते एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे, आम्ही बोलायचे कुणाशी. अरे येथे तुमचे हजारो बाप आणि आया बसले आहेत त्यांच्याशी येऊन बोला ना, असे आक्रमक मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत असल्याचा आरोप केला. तसेच असे असूनही एसटी कर्मचारी सरकारचे बाप निघाले, असे म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असे आम्ही म्हणत नाही, तर पर्याय पण देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळते, तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसे मिळू शकते हे सांगितले. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ७ तारखेला झाले पाहिजे. एक दिवस सुद्धा पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही राज्य सरकारमध्ये आम्हाला घेऊ शकता. हे कष्टकरी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो. पण यांना तो भ्रष्टाचार थांबवायचा नाही. त्यांचा जीव तिथे अडकला आहे.

या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी ताकदीने भाग घेतल्यामुळे आज सरकारच्या नाकीनऊ आले आहेत. सरकारला काही सुचेना. त्यांना काय करावे कळेना. काल तर त्यांनी हे आंदोलन नेतृत्वहीन झाले असल्याचे म्हणत आम्ही बोलायचे कुणाशी असे विचारले. अरे बोलायचे कुणाबरोबर येथे तुमचे हजारो बाप आणि आया बसले आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना. मी आझाद मैदानावर बोलत असताना माझा आवाज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल आणि त्यांना ऐकू येत असेल, तर तो आवाज या महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा असल्याचा गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, तुम्हाला काही बोलायचे असेल, तर ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोला. मागणी एकच आहे, ती म्हणजे विलिनीकरणाची, दुसरी तिसरी चौथी पाचवी काही नाही. सरकार दररोज चॅनलच्या माध्यमातून नवीननवीन काही तरी सांगते. पण तुम्ही सरकारचे बाप निघालात, एसटी कर्मचारी डगमगायला तयार नाहीत.

आतापर्यंत ड्रायव्हर आणि कंडक्टर भित्रा होता. काही नोटीस आली की तो एसटीत जाऊन बसायचा. ती एसटी कितीही वाजूदे, त्यात ऑईल असू दे नसू दे यांची गाडी सुसाट चालू व्हायची. आता चालक, वाहक घाबरायला तयार नाही. तुम्ही काहीही करा, आम्हाला विलिनीकरण पाहिजे या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम राहिले, असेही पडळकरांनी नमूद केले.