पत्नीने केलेल्या आरोपांवर अनिकेत विश्वासराव म्हणतो…


पुणे – प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई वडिलांवर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पत्नी स्नेहाने तक्रार दाखल केली असून तिने यात तिच्या पतीसहीत सासू, सासऱ्यांकडून आपल्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप करत पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. अनिकेत बरोबरच त्याचे वडील चंद्रकांत आणि आई अदितीविरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण आता या प्रकरणावर अनिकेतने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर माझ्या पत्नीने केलेले आरोप हे खोटे असल्याचे अनिकेतने म्हटले आहे. माझ्या पत्नीला मी मारहाण करतो, अशी जी तक्रार दाखल करण्यात आली, ती साफ खोटी असल्याचा दावा अनिकेतने एका संकेतस्थळाशी बोलताना केला आहे. अनिकेतने त्याचवेळी मी आणि पत्नी एकत्र राहत नसल्याचेही सांगितले आहे. ती पुण्यात असते, तर मी मुंबईमध्ये राहत असल्याचे अनिकेतने म्हटले असून आम्ही अजून घटस्फोट घेतलेला नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. आम्ही दोघे मागील अनेक महिन्यांपासून एकत्र राहत नसून पुढील परिस्थितीबद्दल आताच काही सांगू शकत नसल्याचे अनिकेत म्हणाला.

आपल्याविरोधात पत्नीने अशी तक्रार का केली आहे, याची काहीच कल्पना आपल्याला नसल्याचेही अनिकेत म्हणाला आहे. हे का केले जात आहे, मला कळत नाही. मला अजून पोलीस स्थानकामधून कोणताही फोन आलेला नसल्यामुळे याबद्दल मी अधिक बोलू शकत नसल्याचेही अनिकेत म्हणाला.

पोलिसांनी स्नेहाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे म्हटले आहे.