238 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा एसटी महामंडळाकडून निर्णय


मुंबई – राज्याच्या लालपरीला मागील 2 आठवड्यांपासून ब्रेक लागला आहे. कर्मचारी एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. संप अद्यापही मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यामुळे आता एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एसटी महामंडळाने काल 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केल्यामुळे निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 एवढी झाली आहे.

दोन आठवडे एसटी संपाला झाले, तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. राज्याची जीवनवाहिनी दिवाळीपासून ठप्प आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी कामगारांनी ते धुडकावले आहे. त्यातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात हजर व्हावे, असे आवाहन आंदोलक नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सांगितले. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे संपाचा तिढा कायम आहे.