हाउस टेस्टरच्या नोकरीत दिवसाला १७ हजार पगार


कुटुंब चालवायचे तर पैसा हवा. त्यासाठी कुणी नोकरी करते कुणी व्यवसाय. नोकरी नेहमी मनासारखी मिळतेच असे नसते. अनेकदा पगार कमी असतात, काही ठिकाणी काम खूप असते तर काही नोकऱ्या धोकादायक असतात. चीन मध्ये एक खास प्रकारच्या नोकरीसाठी मालकांकडून मोठी डिमांड आहे. ही नोकरी आहे हाउस टेस्टरची. यात पैसे मिनिटाच्या हिशोबाने मिळतात. तासाला ६० युआन म्हणजे साधारण ७०० रुपये. चोवीस तास काम झाले कि १६७४४ म्हणजे साधारण १७ हजार रुपये मिळतात.

काय आहे हि नोकरी? चीन मध्ये सुद्धा भारताप्रमाणे भूत प्रेते, झपाटलेल्या इमारती, घरे असे सर्व प्रकार आहेत. हॉंगकॉंगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार प्रॉपर्टी डीलर झपाटलेली घरे, इमारती किंवा अन्य जागा विकताना या जागेत भुते खेते नाहीत हे सिद्ध करण्यासाठी हाउस टेस्टरना काम देतात. जर कुणाला घर किंवा मालमत्ता घ्यायची असेल आणि तिची ख्याती झपाटलेली अशी असेल, त्या ठिकाणाबद्दल काही विचित्र कथा असतील तर अश्या मालमत्ता खरेदी करण्यास तयार होत नाहीत. म्हणून हे टेस्टर त्या घरात रात्रभर राहून तेथे असा काही प्रकार नाही याची खात्री पटवून देतात.

दीर्घकाळ बंद असलेली घरे, जुने पुराने विराण बंगले, इमारती, यासाठी असे हाउस टेस्टर नेमले जातात. चीन मध्ये अशी नोकरी नवलाची बाब नाही. अशा घरात हाउस टेस्टर २४ तास मुक्काम टाकतात, रात्री झोप काढतात. या सर्व हालचालीचा व्हिडीओ बनवून तो ग्राहकांना दाखविला जातो आणि अशी घरे विकली जातात. त्यासाठी व्यावसायिक होम टेस्टर मोठे पगार देऊन नेमले जातात. अर्थात वाटते तितकी ही नोकरी सोपी नाही. कारण होम टेस्टरला अश्या घरात राहताना स्वतःच्या जबाबदारीवर राहावे लागते. कधी कधी त्यात त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पण अनेकवेळा घर मालकाकडून सुद्धा पगाराव्यतिरिक्त बक्षिसी दिली जाते.