पुजाऱ्याची असीम भक्ती, हात मोडलेल्या मूर्तीला डॉक्टरनी केले प्लास्टर

आग्रा शहरातील शहागंज भागात असलेल्या पटवारी टेम्पल ऑफ खासपुरा येथे एक अनोखी घटना घडली. मंदिरातील लड्डू गोपाल मूर्तीचा हात मोडल्यावर व्यथित झालेल्या पुजाऱ्याने मूर्ती सह जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि त्याची असीम भक्ती पाहून तेथील डॉक्टरने मूर्तीच्या हाताला प्लास्टर घालून दिले.

हकीकत अशी की या मंदिरात ३० वर्षापूर्वी लड्डू गोपाल मूर्ती स्थापन केली गेली असून तेव्हापासून लेखसिंह हे पुजारी या मूर्तीची पूजा करत आहेत. मूर्ती स्थापन केली गेली तेव्हा लेखसिंह लहान मुलगा होते. तेव्हापासून या देवाची ते आराधना करत आहेत.

शुक्रवारी सकाळी या कृष्णमूर्तीला स्नान घालत असताना त्याच्या हातून ती खाली पडली आणि मूर्तीचा हात तुटला. हे पासून लेखासिंह व्यथित झाले आणि त्यांनी हाताला मलम लावून मांडीवर मूर्ती ठेवली. हि घटना सकाळी ६ वा. घडली. जिल्हा रुग्णालय आठ वाजता उघडल्यावर त्यांनी मूर्ती सह रुग्णालय गाठले. श्रीकृष्ण नावाने केसपेपर काढला आणि डॉक्टरना मूर्तीच्या हातावर उपचार करा असा आग्रह धरला. उपस्थित डॉक्टरने नकार देताच लेखसिंह यांना अतीव दुःख झाले आणि त्यामुळे ते रडू लागले आणि रडता रडता बेशुध्द झाले. तोपर्यंत ही घटना समजल्यावर मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली.

शेवटी जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ. अशोक अग्रवाल यांना ही घटना समजली. त्यांनी स्वतः येऊन लड्डू गोपाल मूर्तीचा हात तपासला. मूर्ती अष्टधातूची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी लेखासिंह यांना हाताला प्लास्टर घालता येणार नाही हे पटवले नी बँडेज बांधून मूर्तीची पुन्हा मंदिरात रवानगी केली.