कमला हॅरीस यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे

अमेरिकेच्या व्हाईट हाउस मध्ये एक वेगळा इतिहास रचला गेला. शुक्रवारी व्हाईट हाउस तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्याकडे काही काळासाठी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सोपविली आहेत. या काळात कमला हॅरीस त्यांच्या वेस्टविंग कार्यालयातून काम करणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदी नेमणूक झालेल्या कमला पहिल्या महिला आहेतच पण कार्याध्यक्ष बनलेल्या त्या पहिल्या अश्वेत महिला बनल्या असल्याने नवा इतिहास रचला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नियमित स्वास्थ्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असून तेथे त्यांच्यावर कॉलोनोस्कोपी केली गेली. त्या काळात बायडेन यांना भूल दिली गेली त्यामुळे ते बेशुद्धावस्थेत होते. अर्थात याची पूर्वीच कल्पना असल्याने बायडेन यांनी काही काळासाठी कमला हॅरीस यांच्याकडे सत्ता हस्तांतरण केले. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्यक्षानी काही काळासाठी त्यांचे सर्व अधिकार उप राष्ट्राध्यक्षाना सोपविल्याचा प्रकार घडला आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार राष्ट्र, विना राष्ट्राध्यक्ष राहू शकत नाही. त्यामुळे या काळात बायडेन यांनी न्युक्लीअर बॉल सह सर्व अधिकार कमला यांना दिले.

कमला यांच्याकडे न्युक्लीअर बॉलची एक कॉपी असतेच पण या काळात त्यांच्याकडे दोन न्युक्लीअर बॉल होते. बायडेन यांचे खासगी डॉक्टर डेव्हिड ओ’कॉनर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या मेडिकल बुलेटीन नुसार बायडेन यांची प्रकृती एकदम फिट आहे. १९८८ मध्ये त्यांना करोनरी विकाराचा त्रास झाला होता तेव्हा त्यांच्यावर याच डॉक्टरांनी उपचार केले होते. बायडेन नियमित औषधे घेतात आणि ते एकदम फिट आहेत असे डॉक्टर्सकडून सांगण्यात आले आहे.

२०२० मध्ये करोना काळात बायडेन राष्ट्राध्यक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले तेव्हा त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला होता, दुसरा डोस पदग्रहण केल्यावर काही काळाने दिला गेला तर बुस्टर डोस सप्टेंबर मध्ये दिला गेल्याचे सांगितले गेले आहे.