सेक्सटींग प्रकरणामुळे टीप पेनने सोडले ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे कर्णधार पद


होबार्ट – सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेनने कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. होबार्ट येथे शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम पेनने यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटने दिले आहे. पेनने आपल्या एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अयोग्य भाषेमुळे वादात सापडल्यानंतर कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. टीम पेनला मार्च २०१८ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदी नियुक्त करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचा तो ४६ वा कर्णधार ठरला होता.

मी ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या कसोटी क्रिकेटमधील कर्णधार पदावरुन आज पायउतार होत असल्याची घोषणा करत आहे. माझ्यासाठी फार कठीण असा हा निर्णय होता. पण हा निर्णय माझ्या दृष्टीने, माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने आणि क्रिकेटच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे टीम पेनने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय घेण्यामागे चार वर्षांपूर्वी माझ्या तत्कालीन सहकाऱ्यासोबत केलेला संवाद कारणीभूत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला. या तपासामध्ये मी पूर्णपणे सहकार्य केले आहे. यामधील तपासाला शक्य ती मदत मी केली आहे. या तपासामध्ये तसेच क्रिकेट टास्मानियाच्या एचआर तपासामध्ये या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. असे असले तरी या प्रकरणाचा पश्चाताप मला तेव्हाही होता आणि आताही असल्याचे टीम पेन म्हणाला.

माझ्या पत्नीशी आणि कुटुंबाशी मी याबद्दल चर्चा केली. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि माफी यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पण हे प्रकरण मागे पडेल आणि मागील तीन ते चार वर्षांपासून ज्यापद्धतीने मी काम करत आहे, त्याच पद्धतीने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकेल, असे मला वाटलेले, पण हे खासगी संभाषण सार्वजनिक केले जाणार असल्याची माहिती नुकतीच मला मिळाली. २०१७ साली घडलेली ती गोष्ट ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून माझ्याकडून घडायला नको होती. या कृतीमधून मी माझ्या पत्नीला, कुटुंबाला आणि इतर कोणालाही दुखावले असेल, तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. या प्रकरणामुळे खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असेल, तर मी माफी मागतो, असे टीम पेन म्हणाला.

तसेच माझ्यासाठी कर्णधार पद सोडणे हा योग्य निर्णय असून या क्षणापासून आता मी पद सोडत आहे. येणाऱ्या अॅशेज मालिकेआधी हे प्रकरण संघाच्या कामगिरीमध्ये अडसर ठरु नये, अशी माझी इच्छा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार ही जबाबदारी मला फार प्रिय आहे. माझ्या क्रीडा क्षेत्रातील आयुष्यामधील हा सर्वात मोठा सन्मान होता की मी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले. मी मला पाठिंबा देणाऱ्या संघ सहकाऱ्यांचा आभारी आहे. आम्ही जी कामगिरी या कालावधीमध्ये केली, त्याचा मला अभिमान आहे. मी त्यांचीही माफी मागतो. मी ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. माझ्या भूतकाळातील वागणुकीमुळे संघाच्या अॅशेजमधील कामगिरीवर परिणाम झाल्याबद्दल मला माफ करा. संपूर्ण क्रिकेट क्षेत्राला आणि चाहत्यांना माझ्या वागण्यामुळे निराशाजनक वाटले असेल, तर मला माफ करा, असे टीम पेन म्हणाला. ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१७ साली संघाशी संबंधित एका महिला अधिकाऱ्याला टीम पेनने अयोग्य भाषेमध्ये मेसेज केला होता.