कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करण्यामागील कारण विक्रम गोखलेंनी सांगितले


देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. गेले चार-पाच दिवस त्यांच्या या विधानाचे पडसाद उमटत होते. ‘भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असे कंगना म्हणाली होती. आपण तिला समर्थन दिल्यामागे स्वतःची काही कारणे होती, असे स्पष्टीकरण गोखले यांनी दिले आहे.

अभिनेते विक्रम गोखले यासंदर्भात भाष्य करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, कंगना राणावत या मुलीने व्यक्त केलेली तिची मते वैयक्तिक आहेत, माझीही वैयक्तिक आहेत. तिने तसे वक्तव्य केले याला तिची कारणे आहेत आणि मी त्याला दुजोरा दिला याला माझी वेगळी कारणे आहेत. आमची ओळख नाही, संबंध नाही. तिच्याशी नसली तरी माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे. १८ मे २०१४ चा गार्डियन पेपर वाचा. त्यात जे लिहिलेले आहे, तेच कंगना बोलली आहे. कंगना काहीच चुकीचे बोलली नाही आणि माझे मत मी बदलणार नाही. माध्यमांनी माझे भाषण पूर्ण दाखवलेच नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला. पण माझ्या मतांवर मी ठाम आहे. १८ मे २०१४ ला खऱ्या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभे राहायला सुरूवात केली.

विक्रम गोखले कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, खरे आहे, कंगना जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेले आहे, यावर मी सहमत आहे. हे दिलेले गेले आहे बरे का. ज्या योद्ध्यांनी हे मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवले नाही त्यांनी. ब्रिटिशांविरुद्ध आपल्या देशाचे हे लोक उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवले नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. याबाबत मी भरपूर वाचलेले आहे.

तसेच, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा हा अवमान नाही का? असा प्रश्न विचारला असता विक्रम गोखले म्हणाले, आहेच, पण हे आपण सगळ्यांनी समजावून घेतले पाहिजे. आपण म्हणजे कोण आपण सरकार देतो. हा आपला अधिकार आहे. आपण सरकारला जाब विचारलाच पाहिजे, की तुम्ही हे काय करत आहात? मी तर म्हणेण की यापुढे होणार कुठलाही मोठा खर्च त्याबद्दलचे ऑडीट हे जनतेला माहिती असले पाहिजे, की आम्ही पैसे भरत आहोत. आम्ही देशातून पैसा चोरून बाहेर स्वीस बँकेत नेऊन ठेवत नाही. कर भरतो हा सामान्य माणूस कर भरतो, त्याचा प्रत्येक ठिकाणी हक्क आहे. त्यांनी विचारले पाहिजे की आमच्या पैशांचे तुम्ही काय करत आहात? कंगनाच्या वक्तव्याशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेले आहे. मतपेटीचे राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात. यामध्ये सगळे आले, एकही पक्ष असा नाही की जो वादात पडत नसल्याचेही यावेळी विक्रम गोखले यांनी बोलून दाखवले.