‘त्या’ बारचे आपणच मालक असल्याची समीर वानखेडेंची कबूली


मुंबई – पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधताना ते एका बारचे मालक असल्याचा दावा केला आहे. नवी मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक वानखेडे हे असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे असल्याचे मलिक यांनी सूचित केले आहे. पण यासंदर्भातील एका वृत्ताबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरवर नवाब मलिका यांनी सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र असल्याचे कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला आहे.

पण टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचे स्पष्ट केले आहे. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. मी सेवेमध्ये रुजू झालो तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कमाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला असल्याचे वानखेडे म्हणाले आहेत.

नवी मुंबईमधील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा बार आणि रेस्तराँ आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहे. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.