पाकिस्तान संसदेचा नवा कायदा; लैंगिक शोषण करणाऱ्याला केले जाणार नपुंसक


इस्लामाबाद : वाढत्या लैंगिक अत्याचारांना रोखण्यासाठी पाकिस्तानात एक कठोर कायदा करण्यात आला आहे. लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पाकिस्तानच्या संसदेने पास केले आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या या कायद्याअंतर्गत दोषीला औषध देऊन नपुंसक केले जाणार आहे. देशात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. जनतेच्या मनातील रोष लक्षात घेऊन पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले होते. या विधेयकाला संसदेने मंजूरी देत त्याचा नवीन कायदा केला आहे.

या अध्यादेशाला पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेटने मंजूरी दिल्यानंतर आणि राष्ट्रपती आरिफ अल्वीद्वारे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर पाकिस्तानच्या संसदेत हे विधेयक पास झाले आहे. बुधवारी पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त सत्रात ३३ इतर विधेयकांसोबत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयक २०२१, सादर करण्यात आले होते. इतर विधेयकांबरोबरचा हा लैंगिक अत्याचाराशी निगडीत विधेयकदेखील पास झाले आहे. डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या कायद्याअंतर्गत पाकिस्तान दंड संहिता १८६० आणि दंड प्रक्रिया संहिता १८९८ मध्ये सुधारणा होणार आहे.

विधेयकानुसार गुन्हेगाराला रासायनिक पातळीवर नपुंसक बनवले जाणे, ही अशी प्रक्रिया आहे, ज्याला पंतप्रधानांनी बनवलेल्या नियमाद्वारे अधिसूचित करण्यात आले आहे. दोषींना या कायद्याअंतर्गत औषध देऊन नपुंसक बनवले जाणार आहे. अधिसूचित बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कायद्यामध्ये ही तरतूद आहे की घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत पीडितेची तपासणी होईल.

दरम्यान या विधेयकाला जमात-ए-इस्लामीचे खासदार मुश्ताक अहमद यांनी विरोध केला आणि याला बिगर इस्लामी आणि शरियाच्या विरोधात असल्याचे म्हटले. मुश्ताक अहमद यांनी म्हटले की गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली पाहिजे. पण नपुंसक बनवण्याचा कोणताही उल्लेख शरियामध्ये नाही. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार इतरही काही देशांमध्ये या प्रकारची शिक्षा दिली जाते. टीकाकारांच्या मते पाकिस्तानात लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांपेक्षाही कमी खटल्यांमध्ये आरोप सिध्द होतो.