मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यामुळे कंगनाचा संताप


कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्र सरकार 3 सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याची तसेच राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी बांधवांनी मागे फिरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दरम्यान देशभरातून मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया येत आहे. पण अभिनेत्री कंगना राणावतने मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

कंगना राणावतने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. तसेच संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले, तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. याआधी सरकारच्या कायदे आणण्याच्या निर्णयाचे कंगनाने समर्थन केले होते.

दरम्यान कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकर्‍यांना आम्ही पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे. तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कायदा मागे घेत नवीन सुरुवात करु.