उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील समीर वानखेडेंच्या ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख


मुंबई – पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे वानखेडे हे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.

समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे, अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला आहे. आज मलिक पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये ते याच बाबतीत अधिक खुलासे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार बार आणि रेस्तराँचा समीर वानखेडे यांच्या नावे परवाना आहे. हा बार नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहे. २७ ऑक्टोबर १९९७ रोजी हा परवाना जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


मलिक यांनी गुरुवारीच वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते ‘मुस्लीम’ असल्याची नोंद असल्याचा दावा केला आहे. वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविल्याच्या आरोपाचे समर्थन करण्यासाठी मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुस्लीम अशी नोंद असल्याची माहिती दिली. मुंबई पालिकेच्या दस्तऐवजांमध्ये वानखेडे यांनी खाडाखोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) वानखेडे अधिकारी आहेत. मुस्लीम धर्मीय असताना त्यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी गुरुवारी काही दस्तऐवज उघड केले. त्यात वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दोन दाखल्यांचा समावेश आहे. दोन्ही दाखल्यांवर ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नाव असून, धर्माच्या रकान्यापुढे मुस्लीम अशी नोंद आहे.