चंद्रकांत पाटील म्हणतात… मोदींना मी विनंती करणार कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी


मुंबई – अखेर मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या जिद्दीपुढे नमते घ्यावे लागले. तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. शुक्रवारी देशाला संबोधित करताना १८ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली. सरकारने चांगल्या हेतूने शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा आणला होता, पण काही शेतकऱ्यांना पटवण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

जो चांगला दर मिळण्याचा आनंद शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मिळणार होता, ते कायदे पर्याय नसल्यामुळे मोदींना मागे घ्यावे लागत आहे. अनेक महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. हे कायदे देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत आहात, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातील एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचे काय होते? या देशामध्ये काही चांगले असले की मोदींना विरोध, त्यांच्या निर्णयांना विरोध मग ते सर्वसामान्यांच्या हिताचे असले तरी चालतील. त्यामुळे एका छोट्या गटाला पटवून देण्यामध्ये आम्हाला अपयश आल्याचे मोदींने म्हटले. देशामधील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी या कायद्यावर समाधानी होते, त्यांना कायदे पटले होते. केवळ काही विशिष्ट वर्ग याला विरोध करतात, मोदींचे मन मोठे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.