केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, ते कायदे मागे घेतल्याचा निर्णय आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर या निर्णयावर भाजप नेते मात्र नाराज आहेत. या निर्णयानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अभिनंदन केले आहे.

आपल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री म्हणाले, देशभर शेतकरी कायद्यांविरुद्ध विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. यात नाहक बळी आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझे त्रिवार वंदन. या आंदोलनात जे वीर आपल्या प्राणास मुकले, मी यानिमित्ताने त्यांना नम्र अभिवादन करतो.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारला आता उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली, त्याचे तर मी प्रथम स्वागत करतो. या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे महाविकास आघाडी सरकारने वारंवार सांगितले आहे, त्याचबरोबर शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे.

मोदी सरकारकडून आपल्या असलेल्या अपेक्षा व्यक्त करताना या निर्णयानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी केंद्राने सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे जी नामुष्की आज ओढवली आहे, असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे.