मुंबईतील 14 हजार बालकांना कोरोनाची लागण!


मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. मुंबईत काही प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याचे दिसत होते. पण अशात आता लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

मुंबईतील 14 हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील 9 वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्यानंतर या वयोगटातील मुलांच्या लसीकरण चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. पण चाचण्यांसाठी मुलांचे पालक फारसा पुढाकार घेत नसल्याचेही समोर येत आहे.

मुंबई महानगरपालिकेने जून महिन्यात सेरो सर्व्हे केला होता. त्यावेळी या सर्व्हेक्षणानुसार, 2 हजारांहून अधिक लहान मुलांची तपासण्यात आली होती. या सेरो सर्वेक्षणात 51.18 टक्के मुले कोरोनाच्या संपर्कात आल्याचे निदर्शनात आले होते. दरम्यान पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयात 2 ते 11 वयोगटातील मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी सुरु आहे. यासाठी आतापर्यंत 10 मुलांची नोंदणी करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, रुग्णालयात सध्या लस चाचणीविषयी चौकशी करण्यासाठी पालकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.