भाजप रथीमहारथी युपी मध्ये टाकणार चार महिने मुक्काम
आगामी हिवाळी अधिवेशन संपल्यावर भाजपचे जेष्ठ नेते, गृहमंत्री अमित शहा, रक्षा मंत्री राजनाथसिंग आणि पार्टी अध्यक्ष जे पी नद्डा उत्तर प्रदेशात दोन दोन प्रभागांची जबाबदारी पेलणार आहेत. सर्व निवडणूक प्रभारी या कामी चार महिने उत्तर प्रदेशात त्यांच्या प्रभागात मुक्काम ठोकणार असून त्यासाठी घरे, फ्लॅट भाड्याने घेतले जात असल्याचे समजते. विशेष म्हणजे दिग्गज नेत्यांना प्रथमच निवडणूक प्रभारी बनविले गेले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका भाजप साठी फार महत्वाच्या असून त्यातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची चुणूक पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. परिणामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका भाजपने गंभीरपणे घेतल्या असून विजयासाठी अनेक रणनीती आखल्या जात आहेत. पार्टी नेतृत्वाने सर्व निवडणूक प्रभारीना निवडणूक काळात आपापल्या क्षेत्रात मुक्काम टाकण्याचे आदेश जारी केले आहेत.
आपापल्या प्रभागात मुक्काम टाकल्याने कार्यकर्ते सतत नेत्यांच्या संपर्कात आणि सहवासात असतील. मुख्य प्रभारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती केली गेली आहे शिवाय अन्य सात प्रभारी नेमले गेले आहेत. जे पी नद्डा यांच्याकडे गोरखपूर आणि कानपूर, राजनाथसिंह यांच्याकडे वाराणसी आणि अवध तर अमित शहा यांच्याकडे ब्रज आणि पश्चिम विभागाची जबाबदारी आहे. शिवाय अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, अन्नपूर्णा देवी, सरोज पांडेय, कॅप्टन अभिमन्यू, विवेक ठाकूर यांचे सहाय्य मिळणार आहे.
२०१४ च्या निवडणुकीत अमित शहा यांनी वाराणसी मध्ये भाड्याने घर घेऊन तेथेच मुक्काम टाकला होता आणि निवडणुकीची सर्व सूत्रे हलविली होती असेही सांगितले जाते. अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात ३०० प्लस चा मंत्र दिला आहे आणि उत्तर प्रदेशातील विजय २०२४ च्या विजयाची दारे उघडणार आहे असेही कार्यकर्त्यांना सांगितले आहे.