कोविड १९ लसीचा तिसरा डोस देण्याबाबत होणार निर्णय

भारतात कोविड १९ प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यासंदर्भात तज्ञ समिती नेमली गेली असून या बाबतचे धोरण पुढच्या आठवड्यात होत असलेल्या महत्वाच्या बैठकीत ठरविले जाणार असल्याचे वृत्त आहे. अर्थात तिसरा डोस हा बुस्टर डोस नसेल तर अतिरिक्त डोस म्हणून दिला जाणार आहे. हा डोस अश्या व्यक्तींना दिला जाईल ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. बुस्टर डोस त्यांना दिले जातात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. दोन डोस नंतर काही महिन्याच्या अंतराने बुस्टर डोस दिला जातो.

पण ज्या व्यक्तींची आजारामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे ते लसीचे दोन डोस घेतल्यावर सुद्धा करोना पासून सुरक्षित नाहीत म्हणून त्यांना एक जादा डोस दिला जाणार आहे असे समजते. बुस्टर डोसची सुरवात थोडी उशिरा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना दोन डोस व्यतिरिक्त एक जादा डोस द्यावा अशी शिफारस केली होती. त्यानुसार भारतात सुद्धा असे अतिरिक्त डोस दिले जातील असे समजते. देशात प्रथमच दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या एक डोस घेतलेल्यापेक्षा अधिक झाली आहे. देशात सध्या ३८ कोटी पेक्षा अधिक नागरिक लसीकरण पूर्ण झालेले आहेत. तर एक डोस घेतलेल्याची संख्या ३७.५ कोटी आहे. देशात आत्तापर्यंत ११५ कोटींपेक्षा अधिक डोस दिले गेले आहेत.