आता पाळीव कुत्र्यासाठी सुद्धा फोन – डॉग फोन

ज्या लोकांनी घरात कुत्रा पाळला आहे ते घरातील या श्वानाला कुटुंबीय असल्याप्रमाणे वागवतात. छोट्या मोठ्या गोष्टी करता याव्या म्हणून प्रशिक्षण देतात. कुत्री मुळात समजदार असतात त्यामुळे शिकविलेल्या गोष्टी आत्मसात करतातच पण मालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. याचाच पुढचा भाग म्हणजे संशोधकांनी आता कुत्र्यासाठी फोन तयार केला असून त्यामुळे बाहेर गेलेल्या मालकाशी कुत्रा संवाद साधू शकेल तसेच मालकाने फोन केला तरी फोन घेऊ शकेल. हा फोन सध्या प्रोटोटाईप आहे. एखाद्या बॉलसारखा हा फोन हालचाली समजू शकतो आणि संगणकाशी कनेक्ट होऊ शकतो. या फोनवरून व्हिडीओ कॉल करता येतात.

जगात अश्या प्रकारचा फोन प्रथमच बनविला गेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो येथील डॉ. इलियाना यांनी त्यांच्या आल्टो विद्यापीठातील सहकाऱ्याच्या सहाय्याने तो बनविला आहे. इलियाना यांच्याकडे १० वर्षाचा कुत्रा जॅक आहे. एलीयाना प्राणी संगणक इंटरअॅक्शन तज्ञ आहेत. त्यांच्या मते इंटरनेट कनेक्टेड सर्व स्मार्ट टॉईज बाजारात आहेत तरीही डॉग मालकांना त्यांच्या पेटशी कनेक्ट राहण्यासाठी उपकरण हवे यातून हा फोन तयार केला गेला. इलियाना स्वतः त्यांच्या कुत्र्याला घरी ठेऊन काही दिवसांसाठी बाहेर जाणार होत्या तेव्हा त्यांनी डॉगफोन तयार केला.

इलियाना यांच्या म्हणण्यानुसार जॅकने हा फोन बरेचदा अपघाताने वापरला पण अनेकदा त्याने स्वतःहून कॉल लावला. हा बॉल सारखा फोन हलवला कि त्यातील एक्सेलोमीटर काम करतो आणि व्हिडीओ कॉल लागतो. इलियाना यांनीही बाहेरून अनेकदा जॅक ला कॉल लावला आणि स्क्रीनवर इलियाना यांना पाहताच जॅक खुश झाला. त्याने तोंडातून खेळणी आणून इलियाना यांना दाखविली, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. आता हे डिव्हाईस अधिक सुलभ आणि उपयुक्त बनविण्यासाठी पुढे संशोधन केले जात आहे.