एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री अनिल परब यांचे मोठे वक्तव्य


मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अद्याप संपलेला नाही. आंदोलक कर्मचारी राज्य सरकारकडून वारंवार आवाहन करून देखील आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे, आता राज्य शासनाकडून वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी याच पार्श्वभूमीवर आज एक मोठे वक्तव्य केले आहे. अगोदरच्या भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचे, अनिल परब यांनी सांगितले आहे. आंदोलक कर्मचारी कामावर परत आले नाही, तर नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.

यासाठी २०१६-१७ आणि २०१९ मधील भरतीतील प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शेवटी एसटी ही गरिबांची जीवनवाहिनी आहे आणि ती जर ठप्प झाली. तर, सरकारचे दायित्व आहे की, लोकांचे देखील सरकार आहे, जसे कर्मचाऱ्यांच्याबाबतीत सरकारचे धोरण आहे, तसे लोकांच्या बाबतीत देखील लोकांना पर्यायी व्यवस्था करून देणे हे देखील सरकारचे काम आहे. त्यामुळे हे कामगार जर आपल्या मागणीवरती अडून बसले, तर सरकारला वेगवेगळ्या पर्यायांचा उपाय योजलाच पाहिजे आणि त्या पद्धतीचे प्रक्रिया सुरू झाली आहे.

तर, आता नवीन समिती नेमण्याची मागणी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. सरकारने नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करा, अशी मागणी कर्मचारी संघटनेने उच्च न्यायालयात केली आहे. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.