एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवार केले मोठे वक्तव्य


गडचिरोली : चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असून शरद पवार तब्बल दोन वर्षांनी विदर्भ दौऱ्यावर असल्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. शरद पवार यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. त्यांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केले

शरद पवार यानी राज्यात सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना एसटी संपाबाबत मार्ग निघाला पाहिजे, असे म्हटले आहे. पण त्याचबरोबर विलीनकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सेवेत एसटी कर्मचाऱ्यांना घेणे सोपे नाही. राज्यात खूप महामंडळे आहेत. त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. एकाला सेवेत घेऊन दुसऱ्याला दुखावणे योग्य नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

सध्या राज्यात सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना बाजूला ठेवायला हवे असल्याचे सांगत शरद पवार यांनी राज्यातील हिंसाचारावरुन भाजपवर टीका केली आहे. त्रिपुरातील घटनेचे पडसाद अमरावतीत का उमटले असा सवाल करत भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

नाना पटोले स्वबळावर निवडणूकीची भाषा बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला सरकार आणि संघटनाही चालवायची असल्याचा टोला शरद पवार यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. विकासापासून गडचिरोली जिल्हा वंचित आहे, नक्षल संघटनांनी त्याचा फायदा घेतला आहे, जिल्ह्यात विकास महत्वाचा असून सोबतीला कायदा-सुव्यवस्था हवी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दळणवळण साधने नव्हती, कंत्राटदार येत नव्हते, बीआरओने उत्तम काम केले आहे. या कामाने जिल्ह्याने प्रगती साधली जिल्हा परिस्थितीत सुधारणा झाल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.