नवाब मलिकांनी केला समीर वानखेडेंनी पहिल्या पत्नीला तुरुगांत टाकण्याची धमकी दिल्याचा दावा


मुंबई – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात पत्रकार परिषदांचे सत्र सुरुच ठेवले आहे. नवाब मलिकांनी आजही पत्रकार परिषदेत बोलताना समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्यस्फोट मलिकांनी केला आहे. मलिकांनी आज वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला सादर केला. त्या दाखल्यामध्ये समीर वानखेडेंचे नाव समीर दाऊत वानखेडे असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, असेही नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे.

आता हळूहळू समीर वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येऊ लागला आहे. वानखेडेंचा शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांखाली फसवण्याचे काम केले. एनडीपीएस कोर्टात त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात आयपीएस अधिकाऱ्याने मागणी केली आहे की, त्या इमारतीतील सीसीटीव्ह तपासून पाहा. त्यांच्या घरी कोणताही छापा पडला नाही. त्या इमारतीच्या आवारात वानखेडे आणि त्यांचे अधिकारी फिरत होते. मुलाला घरातून बोलावून घेतले आणि बोगस केस करुन ड्रग मिळाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण देत पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप लावले आहेत.

नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, ज्या मुलीशी लग्न करुन घटस्फोट दिला. ती मुलगी वाद निर्माण झाल्यानंतर समोर येऊन समीर वानखेडेंचे सत्य समोर आणेल. त्या मुलीच्या मामेभावाजवळ या भितीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून ड्रग पोहोचवण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारची एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्याचे कटकारस्थान रचले. तो मुलगा आजही तुरुंगात आहे. त्याला अडकवल्यानंतर त्याला समीर वानखेडे धमकी देत होते. माझ्याविरोधात जर बोलण्यासाठी तुम्ही समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाला मी तुरुंगात टाकेन. अशी दहशत यांनी निर्माण केली होती.

माझ्याविरोधात समीर वानखेडेंच्या वडिलांनी एक कोटी 25 लाखांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. न्यायाधीशांनी त्यावेळी म्हटले की, एक आमदार असताना, एका पक्षाचा प्रवक्ता असताना याची पडताळणी करणे गरजेचे होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही महानगरपालिकेचे सर्व दस्तावेज तपासून पाहिले. आम्ही सर्व कागदपत्र उपलब्ध करुन घेतले. त्यानंतर आम्ही आमच्याकडे असणारे पुरावे न्यायालयाकडे सादर केले आहेत. आज याबाबत सुनावणी पार पडणार असल्याची माहिती नवाब मलिकांनी दिली.

खोट्या नोटांचे देखील समीर वानखेडे खिलाडी आहेत. 14 कोटी 56 लाख रुपये खोट्या नोटा पकडण्यात आले होते. त्यावेळी यांनी 8 लाख रुपये केवळ दाखवले होते. त्यांनी त्यावेळी संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

यावेळी बोलताना नवाब मलिकांनी भाजपवरही टीका केली. नवाब मलिक म्हणाले की, आमचे स्पष्ट मत आहे की, अनिल देशमुख यांना अडकवण्यात आले आहे. वाझे आणि परमबीर यांनी हे सगळे प्रकरण केले आहे. कारण सरकारला अंधारात ठेऊन हे दोघे गैर कृत्य करत होते. ज्यावेळी विधान भवनात हे प्रकरण समोर आले, त्यावेळी या दोघांना लक्षात आले की आपल्याला अटक होणार आहे. त्यामुळे यांनी भाजपच्या नेत्यांना हाताशी धरून अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. हा राजकीय डाव होता.