कंगनाच्या वक्तव्याचा सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येने घेतला समाचार


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत आहे. देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. कंगनाने इंन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत गांधींजींना भुकेले आणि चलाक म्हटले. त्याचबरोबर भगतसिंगांना फाशी व्हावी, अशी गांधीजींची इच्छा असल्याचेही म्हटले होते. तिच्या या वक्तव्यामुळं तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच कंगनावर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी पलटवार केला आहे. गांधीजी, नेताजींसह अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे म्हणत अनिता बोस यांनी कंगनावर निशाणा साधला.

कंगनाने मंगळवारी इन्स्टाग्राम स्टोरी टाकत सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधींकडून कोणतेही समर्थन मिळाले नसल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर अभिनेत्रीने गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत कोणासमोर दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळत नसल्याचे म्हटले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर बोलताना भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, फारच गुंतागुंतीचे नेताजी आणि गांधीजींचे नाते होतं. कारण गांधीजींना वाटायचे की, ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर दुसरीकडे माझे वडिल गांधीजींचे मोठे चाहते होते. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, नेताजी आणि गांधीजी दोन्ही व्यक्तिमत्त्व महान होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला. ते एकमेकांना पूरक असून तो एक बंध होता. केवळ अहिंसक धोरणच भारताच्या स्वातंत्र्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा काँग्रेसच्या काही सदस्यांकडून दीर्घकाळ करण्यात येत होता. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीच्या (आयएनए) कारवायांनी देखील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. पुढे बोलताना त्या हे देखील म्हणाल्या की, दुसरीकडे असा दावा करणेही चुकीचे ठरेल की, फक्त नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजी, नेताजींसह अनेकांना प्रेरणा दिली होती.