समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी समोर आणला शाळा सोडल्याचा दाखला


मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारा जन्म दाखला समीर वानखेडे यांनी न्यायालयात सादर केला होता. ज्यामध्ये त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे लिहिले होते. नवाब मलिक यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून आता सेंट जोसेफ हायस्कूल व सेंट पॉल हायस्कूलचे शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला आहे.

समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल माहिती देण्यासाठी मलिक यांनी शाळा सोडल्याचा दाखला समोर आणला. हे प्रमाणपत्र देऊन मलिक यांनी वानखेडे मुस्लिम असल्याचा आरोप केला. सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचे लिव्हिंग सर्टिफिकेट अशी दोन प्रमाणपत्रे मलिक यांनी सादर केली. ही दोन्ही प्रमाणपत्रे समीर वानखेडे यांची असून, त्यात त्यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली समीर वानखेडे यांनी दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ केले. पण त्यांना हे माहीत नव्हते की, महापालिकेने ते दस्ताऐवज स्कॅन करुन ठेवले होते. न्यायालयात ते महानगरपालिकेचा संगणकीय दाखला दाखवत आहेत. आम्ही महापालिकेचे मुळ कागदपत्रे न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आता हळुहळु समीर दाऊद वानखेडेंचा खोटपणा समोर येतो आहे. समीर वानखेडेंनी ज्या मुलीला घटस्फोट दिला होता. ती मुलगी आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते, या भीतीपोटी मुलीच्या चुलत भावाकडे एका ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज ठेवून फसवण्यात आले. राज्याचा अमलीपदार्थ विरोधी पथकामार्फत मुलीच्या भावाला अटक करण्यात आली. तसेच आमच्याविरोधात साक्ष दिली तर पुर्ण कुटुंबाला ड्रग्ज पेडलर बनवून तुरुंगात टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.