भाजपने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल; मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा इशारा


पणजी – आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी गुरुवारी दिला आहे. पण, भाजप या जागेवरून आपल्याला नक्कीच तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. २५ वर्षांहून अधिक काळ या जागेचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रतिनिधित्व केले होते.

पक्षाला मी आधीच सांगितले आहे की पणजीतून मला निवडणूक लढवायची आहे आणि मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल, असे उत्पल पर्रिकर म्हणाले. दरम्यान, सध्या या जागेचे प्रतिनिधित्व करणारे अतानासियो मोन्सेराते इतर नऊ आमदारांसह भाजपमध्ये सामील झाले आहेत. २०१७ ची निवडणूक ज्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकली होती.

भाजपकडून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न दिल्यास काय करणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, यावर बोलण्याची ही वेळ नाही. मला त्याबद्दल आता बोलण्याची गरज नसल्याचे उत्पल पर्रिकर म्हणाले. मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. त्याच पद्धतीने मला काम करावे लागेल. मला काही कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि त्यासाठी शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतो. हे निर्णय मला घ्यावे लागतील. मी पक्षाला सांगितले आहे आणि मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल. माझा विश्वास असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.

मनोहर पर्रिकर यांनी यापूर्वी अनेकदा पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पणजीची जागा काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात यांच्याकडून हरली होती. अमेरिकेतून पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उद्योगपती उत्पल पर्रिकर यांनी मार्च २०१९ मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, संसदीय मंडळ पक्षाच्या तिकिटांबाबतचा निर्णय घेते. कोणीही पक्षाच्या तिकिटासाठी दावा करू शकतो. हा निर्णय शेवटी पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला आहे, स्थानिक पातळीवर नाही. मी नुकताच उत्पल पर्रिकर यांना भेटलो, आम्ही तिकीटाबाबत काहीही चर्चा केली नसल्याचे तानावडे म्हणाले.