गुगल फॉर इंडियाने केली आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा


नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुगल कायमच नवनवे प्रयोग करत असते. त्याच आता भारतातील अब्जावधी लोकांना समोर ठेवत गुगल फॉर इंडियाने नव्या उत्पादनांची घोषणा केली आहे. तसेच नव्या फिचर्सची भर गुगल पेमध्ये केली आहे. शॉर्ट्स व्हिडिओंची लोकप्रियता पाहून यूट्यूबने अधिकृतपणे यूट्यूब शॉर्ट्स लॉन्च केले आहेत. यूट्यूब शॉर्ट्समध्ये वापरकर्ते आता ६० सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ तयार करू शकतील आणि कॉपीराइट मुक्त लाखो संगीत वापरू शकतील, असे गुगलने म्हटले आहे. गुगलने एका कार्यक्रमात गुगल क्लासरूमसह गुगल करिअर प्रमाणपत्राबाबत अनेक घोषणा केल्या आहेत.

दरम्यान दरवर्षी १५०० कोटी रुपयांचे व्यवहार गुगल पेद्वारे केले जात आहेत. आता गुगल पेवर एक स्प्लिट फीचर येत आहे. तुम्ही त्यात तुमचा खर्च गटांमध्ये विभागू शकता. गुगल पे २०२२ पासून हिंग्लिशला (इंग्लिश+हिंदी) देखील सपोर्ट केले जाईल. तसेच पुढील वर्षापासून, गुगल पेध्ये पैसे पाठवण्यासाठी खाते क्रमांक टाइप करण्याची गरज नाही. टाइप करण्याऐवजी, तुम्ही बोलून खाते क्रमांक जोडू शकता. तुमचा दृष्टिकोन गुगल पेला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये समजेल. याशिवाय, गुगल पेमध्ये माय शॉप फीचर देखील उपलब्ध असेल, ज्याच्या मदतीने दुकानदार त्यांच्या दुकानाची यादी करू शकतील.

डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची गुगल इंडियाने घोषणा केली आहे. ६ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत गुगलचे डिजिटल प्रमाणपत्र शुल्क आहे. या प्रमाणपत्रासाठी गुगलने NASSCOM फाउंडेशन आणि टेक महिंद्रा यांच्याशी भागीदारी केली आहे आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमही जाहीर केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रमासाठी गुगल असिस्टंटचा वापर करता येणार आहे. आता गुगल असिस्टंटद्वारे लसीकरणाच्या स्लॉट्सची उपलब्धता ट्रॅक केली जाऊ शकते. तुमच्यासाठी लसीची नोंदणी करण्यास गुगल सहाय्यक सक्षम असेल.