डीजीसीएची नागपूर फ्लाइंग क्लबला मान्यता – विभागीय आयुक्त


नागपूर : नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची पूर्तता केल्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाला मान्यता मिळाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाइंग क्लबच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. डीजीसीएची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

नवी दिल्ली येथील नागरी विमान उड्डयण महासंचालनालयतर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. नागपूर फ्लाइंग क्लब येथे प्रत्यक्ष वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती.

नागपूर फ्लाइंग क्लब येथे 2017पासून वैमानिक प्रशिक्षण बंद होते. वैमानिक प्रशिक्षणाला सुरुवात व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु करण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ तसेच क्लबकडे असलेले सेसना ही चारही विमाने सज्ज करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात आले होते. तसेच उप मुख्य उड्डाण निर्देशक हे पद भरण्यासाठी उच्च न्यायालयाकडून विशेष परवानगी घेण्यात आली होती त्यानुसार आवश्यक असलेली सर्व पदांची भरती करण्यात येवून विमानांची फिटनेस व मेन्टनन्स (एफटीओ) लायसन्स प्राप्त झाल्यानंतर नागरी विमान उड्डयण महासंचालनालयातर्फे प्रशिक्षणासाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणासाठी तसेच फ्लाइंग क्लब नव्याने सुरु करण्यासाठी डीजीसीएचे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातर्फे मिळालेल्या सहकार्याबद्दल विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आभार व्यक्त केले आहे.

महाज्योती संस्थेसोबत सामंजस्य करार
नागपूर फ्लाइंग क्लब व महाज्योतीसोबत विद्यार्थ्यांना कमर्सियल पायलट(CPE) विमान चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार झाला असून त्याअंतर्गत दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नागपूरसह मध्य भारतातील कमर्सियल पायलटसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना सुद्धा प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आह नागपूर फ्लाइंग क्लबमुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात आता संधी उपलब्ध होणार असल्याचेही विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

‘आजादी का अमृत महोत्सवा’निमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करा – प्राजक्ता लवंगारे-वर्मा
आजादीचा अमृत महोत्सव साजरा करताना नागपूरसह विदर्भातील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच लोकजीवनाशी संबंधित असलेल्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांनी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले.

आजादी का अमृत महोत्सतानिमित्त वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करुन भारतीय स्वातंत्र्याच्या आठवणी जागृत करताना प्रगतीचाही आलेख या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने हा महोत्सव साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हानिहाय तसेच विभागीय स्तरावरही आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिल्या असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, या महोत्सवाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा तसेच इतिहासाच्या पाऊल खुणा सुद्धा जनतेपर्यंत पोहचाव्या हा उद्देश आहे.

विदर्भ और आजादी या विषयावरील कॉफी टेबल बुक, विभागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनावर आधारित छायाचित्र स्पर्धा आयोजित करुन त्याचे छायाचित्र प्रदर्शन 15 डिसेंबरपासून सर्व जिल्ह्यांमध्ये रांगोळी स्पर्धा, आजादी दौड, हेरिटेज वॉक तसेच शासनाच्या विविध उपक्रमांवर आधारित व सर्व विभागांचा समावेश असलेल्या प्रदर्शन, विविध क्षेत्रातील स्वकर्तृत्वाने नावलौकिक मिळविलेल्या महिलांसाठीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन, शेती, फळबाग, सिंचन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्तींच्या यशकथा व प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामांचे सादरीकरण आदी विषयांच्या या उपक्रमात समावेश राहणार आहे.

जिल्हाधिकारी आर. विमला यांनी जिल्हास्तरावर आयोजित करावयाच्या विविध उपक्रमाबाबत यावेळी मार्गदर्शन केले. उपायुक्त आशा पठाण यांनी आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने विभागीय स्तरावरील कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत यावेळी माहिती दिली. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.