गोपीचंद पडळकरांना विशेष सुरक्षा देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असून बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. लोकशाहीत हिंसेने विरोधकांचा आवाज दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

विरोधक असो वा सत्ताधारी ज्याच्या जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असे या पत्रात म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

पडळकरांच्या गाडीवर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने हल्ला केला होता तर पडळकरांच्या गाडीवर सांगलीतही तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ला झाला होता. पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नसल्याचा इशाराही पडळकरांनी दिला आहे.