असदुद्दीन ओवेसी यांचा मुस्लीम आरक्षणावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल


मुंबई – मुस्लीम आरक्षणावरून ठाकरे सरकारवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत महाराष्ट्रात मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली. सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या ५० जातींना आरक्षण देता येते म्हटले आहे त्यांना द्या, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले.

याबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्या निकालात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ५० जातींना शिक्षणात आरक्षण देता येते असे म्हटले आहे. कारण या जातींच्या सामाजिक राजकीय मागासपणाची आकडेवारी आणि माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे यानंतरही या जातींना शिक्षणात आरक्षण न देणे अन्याय आहे.

सरकारला आणखी कुणाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी द्यावे. मुस्लिमांचे सामाजिक, शैक्षणिक मागासपण सिद्ध झाले आहे. ते उच्च न्यायालयाने देखील मान्य केले. तरीही मुस्लिमांना सरकार आरक्षण देत नाही. यानंतर आमच्याकडे बोट करून आम्ही धार्मिक असल्याचे म्हणतात. हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे ओवेसी यांनी सांगितले.

तुम्ही सगळ्या मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, पण उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या ५० जातींना आरक्षण देता येते म्हटले आहे त्यांना द्या. भाजपा-शिवसेनेचे आधी सरकार होते, आता ‘थ्री इन वन’चे सरकार आहे. हे थ्री अन वन देखील विसरून गेले. राज्य सरकार आता आरक्षणाचा निर्णय करू शकते याचा संसदेत कायदाही मंजूर झाला आहे. संविधान समानतेविषयी सांगते. त्याआधारावर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळणे गरजेचे असल्याची मागणी ओवेसी यांनी केली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझे काही प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी ओवेसींनी केली.

ओवेसी यांनी विचारलेले प्रश्न

  • ५ एकरपेक्षा अधिक जमीन किती टक्के मुस्लिमांकडे आहे
  • बँक आणि सहकारी सोसायट्यांकडून किती मुस्लिमांना कर्ज मिळते
  • झोपडपट्टीत किती मुस्लीम राहतात
  • पदवीचे शिक्षण किती मुस्लीम घेतात
  • मुस्लीम शाळा किती आहेत