पुणे दौऱ्यात अमित शहा फोडणार महापालिकेच्या प्रचाराचा नारळ


पुणे : 26 नोव्हेंबरला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार असून ते माजी कृषीमंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला या दौऱ्यात भेट देणार अशी चर्चा होती. पण आता अमित शहा या संस्थेला भेट देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याऐवजी भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेला भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची भेट अमित शहांनी जाणिवपूर्वक टाळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अमित शहा या दौऱ्यात पुण्यातील वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेशन या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अमित शहा या कार्यक्रमानंतर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देतील, असे सांगण्यात आले होते.

पुणे दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला शहांनी भेट द्यावी, यासाठी संस्थेचे प्रमुख या नात्याने शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अमित शहांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याच आमंत्रण दिले होते. शहांनी हे आमंत्रण त्यावेळेस स्वीकारल्याचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले होते. पण पुणे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या अमित शहांच्या पुणे दौऱ्यात व्हीएसआयचा उल्लेख नाही. त्याऐवजी अमित शहा पुणे महापालिकेला भेट देणार आहेत.

महापालिकेच्या भेटीनंतर अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश कला- क्रीडा संकुलात भाजपकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांचा अधिकृत दौरा अजून जाहीर झालेला नसला, तरी पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अमित शहांच्या दौऱ्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा समावेश नसल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 26 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा या दौर्‍यात पुणे महापालिकेत सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकारमंत्री येत आहेत. महापालिकेमध्ये दोन पुतळ्यांच्या अनावरणाचा कार्यक्रम अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.

नुकताच पुणे महानगरपालिकेला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शनिवारी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे नोटिफिकेशन येत आहेत ते बघता महापालिका निवडणुका वेळेवर होतील. गेल्या पाच वर्षात जी कामे झाली आहेत, ती पाहता मतदार पुन्हा एकदा भाजपला कौल देतील हा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.