तमिळ ब्राह्मण उपवर मुले वधूच्या शोधात युपी, बिहारकडे

तामिळनाडू मधील ब्राह्मण जातीतील ४० हजाराहून अधिक उपवर मुलांना ब्राह्मण वधू मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे आता युपी, बिहार मधील ब्राह्मण वधू शोधल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या तमिळनाडू मध्ये १० ब्राह्मण उपवर मुलामागे सहा उपवर मुली असे प्रमाण आहे. तमिळनाडू ब्राह्मण संघाने या संदर्भात विशेष अभियान सुरु केले आहे. थामीलनाडू ब्राह्मण असोसिएशनचे अध्यक्ष एन नारायणन यांनी त्यांच्या नोव्हेंबरच्या मासिक पत्रिकेतून खुले पत्र प्रसिद्ध करताना ३० ते ४० वयोगटातील ४० हजाराहून अधिक मुले योग्य वधू नसल्याने विवाहावाचून राहिली आहेत असे म्हटले आहे.

यामुळे हा संघ दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार राज्यात समन्वयक नियुक्त करत आहे. हिंदी लिहिता वाचता येणारे आणि हिंदी बोलू शकणारे सक्षम समन्वयक त्यांना हवे असून अश्या लोकांशी संपर्क केला जात आहे असे समजते. तमिळनाडू मध्ये विवाह हे खर्चिक प्रकरण असून वधू पक्षाला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे गरीब कुटुंबातील वधू पिते मुलींच्या विवाहासाठी पैसे जमविण्यास संघर्ष करतात परिणामी मुलींचे वय सुद्धा वाढत जाते. या भागात ब्राह्मण पोटजातीत सुद्धा एकमेकांशी विवाह केले जात नसत पण आता तसे विवाह होतात असेही समजते.