इजिप्त मध्ये अतिविषारी विंचवांचा पाउस, अनेक लोक दंश झाल्याने रुग्णालयात

इजिप्त मध्ये गेले काही दिवस नागरिक अतिविषारी विंचवांच्या दंशाने हैराण झाले असून हे विंचू आकाशातून पडल्याचे समजते. इजिप्तच्या दक्षिणी आस्वान भागात यावेळी हजारो विंचू बाहेर पडले आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसात ते आकाशातून पडले असे सांगितले जात आहे. या विंचवांनी दंश केल्याने तीन लोकांचा मृत्यू ओढवला असून सुमारे ५०० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या पावसात बिळात पाणी घुसल्याने अनेक साप सुद्धा बाहेर आले आहेत त्यामुळे नागरिकांची भीती अधिक वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार दरवर्षी आस्वान भागात फारतर १ इंच पाउस पडतो. पण यंदा खूपच पाउस झाला आहे. अनेक ठिकाणी बर्फ पडले आहे. या भागात मुळात विंचू अधिक आहेत. दिवसा ते सांदीसपाटीत, खडकाखाली लपतात आणि रात्री किडे, छोट्या पाली खाण्यासाठी बाहेर येतात. येथे अरबी जातीचे अतिविषारी विंचू आहेत. ते रंगाने पिवळे आणि मोठ्या शेपटीचे असतात. जगातील हे सर्वात खतरनाक विंचू मानले जातात कारण ते अतिविषारी आहेत. ते चावले की तत्काळ वेदना सुरु होतात, सूज येते आणि एक तासाच्या आत उपचार सुरु झाले नाहीत तर मृत्यू ओढवतो.

आस्वान विद्यापीठाच्या रुग्णालयात ८९ तर अन्य शहरातील रुग्णालयात विंचू दंश झालेल्या ५०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व डॉक्टर्सच्या सुट्या रद्द केल्या गेल्या आहेत. विंचू विष उतरविणाऱ्या औषधांचा पुरवठा केला गेला आहे. विंचू दंश झाल्याने नजर कमजोर होते म्हणून शहरातील वाहतूक थांबविली गेल्याचेही सांगितले जात आहे.