‘तारक मेहता…’मध्ये ही व्यक्ती घेणार नट्टू काकांची जागा? त्यावर असित मोदी म्हणतात…


छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांचे निधन झाले. आता नट्टू काकांची भूमिका मालिकेत कोण साकारणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर प्रतिक्रिया देत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी नट्टू काकांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात एक व्यक्ती बसल्याचे दिसत होते. तो फोटोपाहून निर्मात्यांना नवे नट्टू काका सापडले अशा चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे आता समोर आले आहे.

प्रोडक्शन हाऊसशी जोडलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये बसलेली ती व्यक्ती कोणताही अभिनेता नाही. ते दुकान मालकांचे वडील आहेत. नट्टू काकांच्या जागी प्रोडक्शन हाऊसला अजून कोणताही अभिनेता मिळालेला नाही. पण लोकांनी अशा अफवा पसरवताना विचार करायला हवा.

दरम्यान, याबाबत मीडियाशी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी देखील संवाद साधला. ते त्यावेळी म्हणाले, आताच घनश्याम यांच्या निधनाला एक महिना झाला आहे. नट्टू काका म्हणजेत घनश्याम माझे खूप चांगले मित्र होते. गेली कित्येक वर्षे त्यांच्यासोबत मी काम करत आहे. मालिकेतील त्यांचे पात्र खूप महत्त्वाचे आहे. सध्या नट्टू काकांच्या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणत्या कलाकाराला घेण्याचा आमचा विचार नाही. या संबंधी सध्या अनेक अफवा सुरु आहेत. पण प्रेक्षकांना विनंती करतो की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.