यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, मीना मंगेशकर यांना जाहीर


मुंबई – आज दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला आहे. यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीतकार प्यारेलाल, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर, संजय राऊत, मीना मंगेशकर खडीकर यांना जाहीर करण्यात आला आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते. तसेच त्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या वर्षी, संगीत आणि कलेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार दिग्गज संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार भारतीय संगीत आणि सिने उद्योगातील समर्पित सेवेसाठी घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्कार तर दीनानाध विशेष पुरस्कार ज्येष्ठ गायिका संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांना देण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रातील आपल्या समर्पित सेवेबद्दल प्रख्यात अभिनेते प्रेम चोप्रा यानाही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील आयुष्यभराच्या सेवेबद्दल मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनाही मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. माला सिन्हा यांनाही चित्रपट क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

संतोष आनंद यांना साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा वागविलासिनी पुरस्कार देण्यात आला आहे. कवियत्री नीरजा यांना कविता आणि साहित्यातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. याशिवाय डॉ. प्रतीत समदानी, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निबोळकर, डॉ. अश्विन मेहता, डॉ. निशित शहा आणि डॉ समीर जोग यांना औषध आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समर्पित सेवेबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.