तामिळ सुपरस्टार सूर्याने केली ‘जय भीम’ची रिअल लाइफ प्रेरणास्थान असणाऱ्या महिलेला १० लाखांची मदत


२ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तामिळ सुपरस्टार सूर्याचा ‘जम भीम’ हा चित्रपट रिलीज झाला होता. सोमवारी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सुर्या आणि ज्योतिका यांच्या होम प्रोडक्शन बॅनरने घोषणा केली की पार्वती अम्मल यांच्या नावावर १० लाख रुपयांची फिक्स डिपॉझिट सुर्या करणार आहे. कारण त्यांच्या जीवनकथेवरून जय भीम या चित्रपटेच्या कथेला प्रेरणा मिळाळी आहे. पार्वती अम्मल यांचे पती राजकन्नू हे पोलिस कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पार्वती यांनी न्याय मागितला होता. दरम्यान १० लाख रुपये सुर्याने फिक्स डिपॉझिट केले असून त्यातून मिळणारे व्याज हे दर महिन्याला पार्वती यांना दिले जाईल. त्यांच्या मृत्यूनंतर फिक्स डिपॉझिटची रक्कम ही त्यांच्या मुलांना दिली जाईल, असे वृत्त द हिंदूने दिले आहे.

टीजे ज्ञानवेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रकाश राज, राजिशा विजयन, मणिकंजन राव रमेश आणि लिजो मोल जोस या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे सध्या कौतुक होत आहे. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.