शरद पवारांकडून नवाब मलिकांच्या कामाचे समर्थन


नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तपास यंत्रणांच्या विरोधात पुरावे सादर करत आहेत. त्यांनी वांरवार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजप तपास यंत्रणाचा वापर करत असल्याचेही मलिकांनी अनेकदा आरोप केला आहे. भाजपने त्यावरुन राष्ट्रवादी आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. नवाब मलिक यांना टीकेचाही सामना करावा लागला आहे. पण मलिकांच्या या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केले आहे. शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर टीकेची झोड उडवली. तसेच नवाब मलिकांच्या कामाचे कौतुकही केले.

शरद पवारांच्या उपस्थितीत दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनी याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अधिकारांचा जिथे गैरवापर होत आहे, त्याला एक्सपोज करण्याचे काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर भारत सरकारने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गैरप्रकार रोखणे आवश्यक असल्याचे म्हणत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचे समर्थन केले. ज्यांना सीमित कार्य काळाकरिता सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला, हे सगळ्या जनतेने पाहिले आहे. अशा पद्धतीचे आरोप सत्ता मिळत नसल्यामुळे नैराश्यातून करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला. देशात भाजपला पर्याय उभा करण्याच्या दिशेने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे सूचक वक्तव्य यावेळी शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांनी दिल्लीत भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातील ठरावावर खरपूस टीका केली. भाजपच्या राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. या बद्दल सकाळी वर्तमानपत्रात वाचले, तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याची खोचक टीका शरद पवार यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत असल्याचे पवार यांनी सांगितले.