शिवसेनाप्रमुखांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण केल्यानंतर रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य


मुंबई – आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून यानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. आज बाळासाहेबांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आदरांजली अर्पण केली. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप आणि आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे, अशी मनोकामना देखील व्यक्त केली.

पुन्हा शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे सरकार स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल, शिवसेनेला त्यासाठी पाच वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे, असं रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी या अगोदर देखील अनेकदा शिवसेना-भाजपने पुन्हा युती करावी, असे बोलून दाखवले आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावे, अजूनही वेळ गेली नसल्याचेही त्यांनी या अगोदर बोलून दाखवले आहे.

तसेच, या अगोदर रामदास आठवले यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे काय होणार? यावर भाकीत देखील केलेले आहे. सातत्याने महाविकास आघडीच्या सरकारमध्ये भांडण असतात. त्यामुळे हे सरकार किती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचे असेल, तर यांनी एकमेकांमध्ये कोपरखळ्या मारणे थांबवे पाहिजे, असे आठवले म्हणाले होते. तसेच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करायचे असेल आणि आपले मतदार जपायचे असतील, तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल. असे रामदास आठवले म्हणाले होते.