लसीकरणला गती यावी म्हणून सलमान खानची मदत घेणाऱ्या ठाकरे सरकारला राम कदमांचा सवाल


मुंबई – कोरोना प्रतिबंधक लस मुस्लीम लोकसंख्या अधिक असणाऱ्या भागांमध्ये घेण्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच लस घेण्यासाठी या भागांतील लोक पुढे येताना दिसत नाहीत. म्हणूनच राज्य सरकार आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे. या मुस्लीम बहुल परिसरांमध्ये सलमानच्या मदतीने जनजागृती करुन येथील लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा सरकारचा विचार आहे. महाराष्ट्र हे कोरोना लसीकरण्याच्या बाबतीत आघाडीचे राज्य आहे. पण लसीकरणाचे प्रमाण काही भागांमध्ये कमी असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजप नेते राम कदम यांनी निशाणा साधला आहे.


सलमान खानला महाराष्ट्र सरकार लसीकरणला गती यावी म्हणून घेणार आहे? की कोणत्या विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी? आम्हाला सलमान खान संदर्भात कोणताही प्रश्न नाही. मात्र भूतकाळ आठवता महाराष्ट्र सरकार आणी काँग्रेसच्या हेतुबाबत शंका जरूर असल्याचे राम कदम यांनी ट्विट करून म्हटले आहे.

सोमवारी जालन्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, लसीबद्दल मुस्लीम बहुल परिसरामध्ये अजूनही शंका आहे. यासाठी आता आम्ही सलमान खान आणि धर्मगुरुंची मदत घेणार असून मुस्लीम समाजातील सदस्यांनी लसीकरण करुन घेण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत. सर्वसामान्यांवर धर्मगुरु आणि कलाकार यांचा फार मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच त्यांचे म्हणणे लोक ऐकतील, असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला. सलमान खानचा मोठा चाहता वर्ग असून महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा मुस्लीम समाजाची अधिक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचा मदत होईल, असा विश्वास सरकारी यंत्रणांना आहे.