पुन्हा एकदा एकूण संपतीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळ पोहोचले उद्योगपती गौतम अदानी


मुंबई – उद्योगपती गौतम अदानी शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड उसंडीमुळे पुन्हा एकदा एकूण संपतीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळ पोहोचले आहेत. अदानींच्या संपत्तीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. अदानींची संपत्ती ज्या वेगाने वाढत आहे, तो वेग पाहता लवकरच ते मुकेश अंबानींची बरोबरी करतील, असे म्हटले जात आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, ५८ वर्षीय उद्योगपती अदानींच्या एकूण संपत्तीत २०२१ मध्ये ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

५० अब्ज डॉलर्सने अदानींची संपत्ती वाढली आहे, तर २१.८ अब्ज डॉलरने मुकेश अंबानींची संपत्ती वाढली आहे. अंबानी पेक्षा अदानींच्या संपत्तीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगात एकूण संपत्तीच्या बाबतीत सध्या टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आघाडीवर आहेत. फ्रान्समधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी या यादीत ११व्या क्रमांकावर आहेत. तर अदानी १३व्या क्रमांकावर आहेत.

अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे थर्मल कोळसा उत्पादक आणि कोळसा व्यापारी तसेच देशातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर आहेत. सध्या अदानीच्या शेअर बाजारात सहा कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय आपल्या सातव्या कंपनीचा IPO लाँच करण्याचा विचार अदानी समूह करत आहे. गेल्या दोन आठवड्यात अदानी एंटरप्रायझेससे शेअर २१ टक्क्यांनी वाढले आहेत.