कुंबळेला ‘त्या’ पदावरुन काढून त्याजागी आयसीसीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची केली नियुक्ती


दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२१ रोजी यासंदर्भातील माहिती आयसीसीच्या गव्हर्निंग बॉडीने दिली. गांगुलीने आपला माजी सहकारी अनिल कुंबळेची जागा घेतली असून कुंबळे या पदावर २०१२ पासून कार्यरत होता. मला आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीच्या अद्यक्षपदी सौरव गांगुलीचे स्वागत करताना फार आनंद होत असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटले आहे.

आयसीसीच्या अध्यक्षांनी, जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि नंतर एक प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणून सौरव गांगुलीचा अनुभव आयसीसीला पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट संदर्भातील निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी महत्वाचा ठरेल. अनिल कुंबळेने मागील ९ वर्षांपासून या पदावर असताना केलेल्या कामासाठी मी त्याचे आभार मानतो. कुंबळेच्या कालावधीमध्ये डीआरएस अधिक नियमतपणे वापरण्यापासून त्यात वेळोवेळी सुधारणा करत गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा झाली. तसेच गोलंदाजीच्या शैलीसंदर्भातही या काळात निर्णय घेण्यात आल्याचे बार्कले म्हणाले.

क्रिकेटच्या खेळामधील महत्वाचे बदल, नियम आणि क्रिकेटचा अधिक अधिक प्रसार करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय़ घेण्याआधी त्यासंदर्भात विचार विनिमय करणे आणि ते निर्णय अंमलात आणण्यासंदर्भातील काम आयसीसीची क्रिकेट समिती करते. मंगळवारी अनेक महत्वाचे निर्णयआयसीसीने घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील क्रिकेटच्या परिस्थितीचा समिक्षा करण्यासाठी एका कार्यकालीन गटाची स्थापना करण्यात आली. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर येथील क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. खास करुन महिला क्रिकेटवरील संकटाबद्दल जगभरातील क्रिकेट जाणकार चिंतेत आहेत. महिलांना क्रिकेट खेळू न देण्याच्या तालिबानच्या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पुरुष संघासोबतचा एकमेव कसोटी सामना रद्द केला आहे.