कंगनाने उडवली महात्मा गांधींच्या अहिंसेची खिल्ली, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक होती असे वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींवर कंगनाने निशाणा साधला असून त्यांच्याकडून सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना कोणताही पाठिंबा मिळाला नसल्याचा असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नसल्याचे म्हणत महात्मा गांधींच्या अहिंसेची खिल्ली उडवली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात सांगितले होते की, देशाला खरा धोका हा खोट्या हिंदुत्ववाद्यांपासून आहे. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा हे लोक हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान युद्ध काढतात. निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक असा एकही मुद्दा सोडत नाही. हे लोक कोण आहेत सगळ्यांना माहित आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यावेळी त्यांना आव्हानही दिले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आता आपण पाहत आहोत की आतमध्ये घुसून चीनने आपल्या कानाखाली मारली आहे आणि आता दुसरा गालही पुढे करत आहेत. काश्मीरमध्ये पंडितांची हत्या होत आहे. या मॅडमना देशात काय परिस्थिती आहे माहिती असायला पाहिजे. महात्मा गांधी विश्वाचे नायक होते. गांधींच्या विचारांवर बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकवेळा टीका केली होती. तरीही महात्मा गांधी स्वातंत्र्य संग्रामचे ते नायक होते, हे मानायलाच पाहिजे. गांधी जयंतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. या मॅडमना हे माहित असायला हवे की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

सत्तेसाठी हिंदूना शिवसेना दोषी ठरवत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, याबाबत पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊतांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांची ही निराशा आहे आणि निराशा जेव्हा हाताबाहेर जाते, तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. मराठी माणसांसाठी आणि देशातील हिंदूसाठी बाळासाहेब ठाकरे हे महान योद्धा होते. त्यांचा आदर्श आणि प्रेरणा आजही आमच्या मनामध्ये कायम आहे. त्यांचे स्मरण होत नाही, असा एकही दिवस जात नाही. संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर अनेक गोष्टींना ब्रेक लागला असता. काय ते मी आता सांगणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.